महाराष्ट्र टाइम्स ™ - MaharashtraTimes

योशिदे सुगा होणार जपानचे नवे पंतप्रधान

japan new prime minister yoshihide suga: जपानचे पंतप्रधानपदी योशिदे सुगा यांची निवड करण्यात आली आहे. लवकरच ते विद्यमान पंतप्रधान शिंजो आबे यांच्याकडून पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतील.

by

टोकियो: जपानचे विद्यमान पंतप्रधान शिंजो आबे यांनी राजीनाम्याची घोषणा केल्यानंतर नव्या पंतप्रधानांचा शोध सुरू करण्यात आला होता. आबे यांच्या जागी त्यांचे विश्वासू समजले जाणारे योशिदे सुगा यांची निवड निश्चित समजली जात आहे. सत्तारुढ लिबरल डेमोक्रेटिक पक्षाच्या नेतेपदाच्या निवडणुकीत सुगा यांनी दणदणीत विजय मिळवला.

योशिदे सुगा यांना ३७७ मते मिळाली. तर, इतर दोन उमेदवारांना एकूण १५७ मते मिळाली. योशिदे हे आबे यांचे दीर्घकाळापासून सहाय्यक होते. सुगा हे पक्षातील कोणत्याही गटाशी संबंधित नाहीत. त्याशिवाय आबे यांच्या धोरणाला पुढे घेण्यासाठी त्यांचा योग्य पर्याय असल्याची चर्चा आहे. सध्या जपानसमोर करोनाचे संकट, अमेरिकेसोबत संरक्षण क्षेत्रातील संबंध आणि ढासळती अर्थव्यवस्था सावरण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे.योशिदे सुगा हे दीर्घकाळापासून कॅबिनेट सचिव म्हणून कार्यरत होते. विद्यमान पंतप्रधान शिंजो आबे यांचे सल्लागार आणि समन्वयक म्हणून कार्यरत राहिले आहे.

शिंजो आबे हे आतड्यासंबंधीच्या आजाराने ग्रस्त आहेत. मागील काही महिन्यांपासून त्यांच्या या आजाराने पुन्हा उचल खाल्ली. उपचाराअभावी पंतप्रधानपदाची जबाबदारी सांभाळता येणार नसल्यामुळे त्यांनी जनतेची माफी मागत राजीनाम्याची घोषणा केली. आबे यांच्यानंतर पंतप्रधानपदी कोण असणार, याची उत्सुकता होती. शिंजो आबे यांनी पंतप्रधानपदाच्या राजीनाम्याची घोषणा केल्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आबे यांच्याबद्दल कौतुकोद्गार काढणारे ट्विट केले होते. पंतप्रधान मोदी यांनी आबे यांच्या प्रकृती स्वास्थासाठी शुभेच्छा दिल्या. आबे यांच्या प्रकृती अस्वास्थाची बातमी ऐकून मनाला वेदना झाल्याचे मोदींनी म्हटले होते. आबे यांचे कुशल नेतृत्व आणि प्रतिबद्धता यांच्यामुळे भारत-जपान यांच्यातील संबंध आणखी मजबूत झाले असल्याचेही पंतप्रधान मोदींनी म्हटले.

https://static.langimg.com/thumb/msid-78103468,width-680,resizemode-3/maharashtra-times.jpg

योशिदे सुगा होणार जपानचे नवे पंतप्रधान